आता गूगल शिकवणार तुम्हाला इंग्रजी; AIची घेणार मदत, असा होणार ‘या’ फीचरचा वापर*

 *आता गूगल शिकवणार तुम्हाला इंग्रजी; AIची घेणार मदत, असा होणार ‘या’ फीचरचा वापर*



युजर्सचे इंग्रजी बोलण्याचे कौशल्य सुधारण्यास मदत करण्यासाठी गूगल एक नवीन फीचर आणत आहे...

एखाद्या शब्दाचा अर्थ, महत्त्वाच्या ठिकाणाचा अचूक पत्ता, तर विविध विषयांची माहिती शोधण्यासाठी सर्च इंजिन गूगलचा (Google) नेहमी वापर केला जातो. अनेकदा इंग्रजी भाषेतील कठीण शब्द किंवा वाक्यांचे अर्थ पटकन समजण्यास कठीण जाते, त्यामुळे अनेकांना इंग्रजी शिकणे गरजेचं आहे असे वाटू लागते. पण, आता तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. कारण आता गूगल युजर्सना इंग्रजी बोलायला शिकवणार आहे. युजर्सचे इंग्रजी बोलण्याचे कौशल्य सुधारण्यास मदत करण्यासाठी गूगल (Google) एक नवीन फीचर आणत आहे. या फीचरचे नाव ‘स्पीकिंग प्रॅक्टिस’ (Speaking Practice) असे आहे. हे नवीन फीचर सध्या अर्जेंटिना, कोलंबिया, भारत, इंडोनेशिया, मेक्सिको आणि व्हेनेझुएला व सर्च लॅबचा हिस्सा असणाऱ्यांसाठी उपलब्ध आहे.


TechCrunch म्हणते की, नवीन फीचर वापरकर्त्यांना एआय सक्षम (AI-powered) इंटरॲक्टिव्ह भाषा शिकण्याची संधी देईल आणि त्यांना नवीन शब्द शिकण्यास मदत करतील; जे नंतर दैनंदिन जीवनात वापरले जाऊ शकतात. TechCrunch च्या मते, स्पीकिंग प्रॅक्टिस सगळ्यात पहिले एक्स (ट्विटर) वर युजर्सनी पाहिले होते. हे नवीन फीचर वापरकर्त्याला एक प्रश्न विचारून मग कार्य करण्यास सुरुवात करते. त्यात वापरकर्त्याला शब्दांच्या संचामधून उत्तर देण्यास सांगितले जाते व त्यावर गूगल एआयच्या मदतीने सोप्पे पर्याय सुचवते.

शेअर केलेल्या स्क्रीनशॉटमध्ये असे दिसते आहे की, या फीचरमध्ये एआय चॅटबॉट असू शकतो. एआय चॅटबॉटच्या मदतीने वापरकर्त्यांचे इंग्रजी सुधारेल. या तंत्रज्ञानाच्या मदतीने वापरकर्ते दररोज नवीन शब्द आणि त्यांचा वापर सहज समजू शकतील. नवीन स्पीकिंग प्रॅक्टिस फीचर वापरण्यासाठी तुमच्या डिव्हाइसवरील गूगल ॲप उघडा आणि वरच्या डाव्या कोपऱ्यात असलेल्या लॅब चिन्हावर टॅप करा. येथे तुम्हाला नवीन फीचर दिसेल. तसेच ही बाब लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की, जर ते तुमच्या खात्यावर उपलब्ध असेल तरच तुम्हाला हे फीचर दिसून येईल. म्हणजेच गूगल हे फीचर सगळ्यांसाठी कधीपासून सुरू करणार, याबाबत सध्या स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.

Post a Comment

Previous Post Next Post