आधुनिक भारताचे निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर
स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजनीतिज्ञ, तत्त्वज्ञ, समाजसुधारक, पत्रकार, वकील, दलित बौद्ध चळवळीचे प्रेरणास्थान आणि भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवक महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती. १४ एप्रिल १८९१ रोजी बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला. प्रचंड बुद्धिमत्ता, समाजासाठी असीम त्याग करणारे, दलित समाजाला हक्क मिळवून देणारे, महाडचा सत्याग्रह, मनुस्मृतीचे दहन, मंदिर सत्याग्रह, शेतकऱ्यांचा कैवारी, गोलमेज परिषद, पुणे करार, स्वतंत्र मजूर पक्ष, बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना, दलित शिक्षण संस्थेची स्थापना, पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना, महिलांसाठी कार्य, स्वातंत्र्य लढ्यात सहभाग अशा कितीतरी गोष्टी बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जीवनात केल्या. समाजासाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातले. समाजामधील तळागाळातील व्यक्तींचा प्रामुख्याने विचार केला. शिक्षणासाठी, समाजाच्या कल्याणासाठी आयुष्यभर संघर्ष केला. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, असा गुरुमंत्र दिला. असामान्य कर्तृत्व गाजवणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरित्राचा अगदी थोडक्यात आढावा...
प्रारंभीचा काळ
मध्य प्रदेशातील महू येथे बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला. बाबासाहेबांच्या वडिलांचे नाव रामजी आणि आईचे नाव भीमाबाई असे होते. मध्य प्रदेशानंतर काही काळ दापोली, सातारा असे वास्तव्य करीत आंबेडकरांचे कुटुंब मुंबईत राहण्यास आले. बाबासाहेबांनी सुरुवातीचे शिक्षण मुंबईतील सरकारी शाळेत घेतले. बाबासाहेबांनी शिक्षण घेण्यासाठी खूप कष्ट सोसले. वयाच्या १४-१५ वर्षी बाबासाहेब आंबेडकर यांचा विवाह दापोली येथील भिकू वलंगकर यांच्या मुलीशी म्हणजेच रमाबाई यांच्याशी झाला. बाबासाहेब आपल्या शालेय जीवनात १८ तास अभ्यास करत असत.
उच्च शिक्षण
मॅट्रिकची परीक्षा यशस्वीपणे उत्तीर्ण झाल्यानंतर बाबासाहेबांनी मुंबई विद्यापीठातून बी.ए. ची पदवी घेतली. बडोदा संस्थानाचे सयाजीराव गायकवाड यांच्या मदतीने बाबासाहेब उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत गेले. कोलंबिया विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयाद एम.ए.ची पदवी संपादन केली. त्यानंतर याच विषयात डॉक्टरेट मिळवली. परदेशातील विद्यापीठातून अर्थशास्त्रात पदवी संपादन करणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पहिले भारतीय होते. बाबासाहेबांनी दोन विषयात एम.ए. केले. दोन विषयात पीएच.डी. मिळवली. बार-अॅट-लॉ आणि डी. एससी पदवी घेतली. ग्रेज इन येथून बॅरिस्टर-ॲट-लॉ ही पदवी घेऊन ३ एप्रिल १९२३ रोजी मुंबईत परतले. समाजकार्य करावे व अर्थाजनासाठी वकिली करावी असा निर्णय त्यांनी घेतला. सुरुवातीच्या काळात बाबासाहेबांनी उत्तम प्रकारे वकिली केली.
सत्याग्रह
सन १९२० मध्ये बाबासाहेबांनी मूकनायक नावाचे वृत्तपत्र सुरू केले. संपूर्ण देशात बहुसंख्य ठिकाणी अस्पृश्यांना सार्वजनिक पाणवठ्यावर पाणी भरण्याचा किंवा पिण्याचा अधिकार नव्हता. त्यामुळेच अस्पृश्यांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी बाबासाहेबांनी महाड येथे पिण्याच्या पाण्यासाठी सत्याग्रह करण्याचे ठरवले. बाबासाहेब आंबेडकरांनी २० जुलै रोजी मुंबई येथे 'बहिष्कृत हितकारिणी सभे'ची स्थ सामाजिक व राजकीयदृष्ट्या तळागाळात फेकल्या गेलेल्यांना भारतीय समाजातील इतरांच्या बरोबर आणणे, हे ह्या सभेचे ध्येय होते. हिंदू असूनही हिंदूच्या मंदिरात प्रवेश मिळत नसल्यामुळे तो समानतेचा अधिकार मिळवण्यासाठी अमरावती येथील प्राचीन अंबाबाई मंदिरात, पुण्यातील पर्वती मंदिरात, नाशिक येथील काळाराम मंदिरात बाबासाहेबांनी मंदिर सत्याग्रह केला.
शेतकऱ्यांसाठी कार्य
शेतीला उद्योग मानून पायाभूत सुविधा पुरवून शेतकर्यांचा आर्थिक विकास झाला पाहिजे. आर्थिक स्रोत तळागाळापर्यंत झिरपले म्हणजे ग्रामीण माणसाच्या मानसिकतेत सकारात्मक बदल घडतील. आर्थिक विषमता जितकी कमी होईल, तितकी जातीय भेदभावाची दरी कमी होईल, असे बाबासाहेबांना वाटत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वांत महत्त्वाची संकल्पना मांडली ती 'शेतीचे राष्ट्रीयकरण' करण्याची. पीकपद्धती, पाणी उपलब्धता, बांधबंदिस्ती, उत्पादकता वाढ, साठवण व्यवस्था, शेतमालाची विक्री, शेतमालाचे भाव या संदर्भात स्पष्ट नियम करावेत, असे त्यांचे स्पष्ट मत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या काही संकल्पनातूनच कमाल जमीनधारणा कायदा, सावकारी व खोती पद्धतींना प्रतिबंध करणारा कायदा, सामूहिक शेतीचे प्रणालीवर आधारित शेती महामंडळ, राज्यातील नद्यांच्या खोर्यांची विभागणी व विकास, जलसंवर्धन योजना अमलात आल्या. शासनाने त्याबाबत कायदे व नियम बनविले. यामागे डॉ. बाबासाहेब यांच्या विचारांचाच प्रभाव दिसून येतो.
असामान्य कर्तृत्व
डॉ. बाबासाहेब आंबेडकर समग्र पीडित, शोषित व दलितांचे प्रतिनिधी म्हणून लंडनच्या तिन्हींही गोलमेज परिषदांचा हजर राहिले. स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेत अस्पृश्यांचे हितसंरक्षण करण्याच्या हेतूने त्यांनी इंडियन राऊंटेबल कॉन्फरन्सला मागण्या सादर केल्या. इ.स. १९२० च्या दशकाच्या अखेरीस डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलितांचे राजकीय नेते बनले होते. इ.स. १९३२ रोजी ब्रिटिश मंत्रिमंडळाने पुणे करार मंजूर करून घेतला. त्यावर मंत्रिमंडळाने शिक्कामोर्तब केले. मजुरांना, कामगारांना हक्क व अधिकार मिळवून देण्यासाठी इ.स. १९३६ मध्ये त्यांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली. बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना, दलित शिक्षणसंस्थेची स्थापना, पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना करून शिक्षणाची दारे खुली केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्त्रीमुक्तीचे पक्के समर्थक होते. त्यांच्यावर तथागत गौतम बुद्धांच्या शिकवणुकीचा आणि महात्मा जोतिबा फुलेंच्या कार्याचा प्रभाव होता. ते स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते होते. स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री असलेल्या बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधानात सिंहाचा वाटा होता. एवढे सूक्ष्म निरीक्षण असणारे आणि कोणावरही अन्याय न करता सर्वांना समान हक्क, अधिकार देणाऱ्या बाबासाहेबांच्या असामान्य बुद्धीची प्रचिती संविधानाच्या वाचनावरून, तरतुदींवरून येतेच.
धर्मांतराची घोषणा
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे कोट्यवधी दलितांना सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी दिवसरात्र झटत होते. हिंदू धर्मात आपल्याला समतेची वागणूक देण्यात यावी यासाठी त्यांनी मोठा लढा दिला. शेवटी हिंदू धर्म त्यागाचा म्हणजेच धर्मांतराचा निर्णय घेतला. हिंदू धर्माचा त्याग केल्यानंतर कोणत्या धर्माचा स्वीकार करायचा, याबद्दल बाबासाहेबांनी सखोल विचार केला. हजारो कार्यकर्ते आणि अनुयायांचा बाबासाहेबांना पाठिंबा होता. अखेर बौद्ध धर्माचा बाबासाहेब आंबेडकरांनी स्वीकार केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली २ मे १९५० रोजी भारतात पहिली सार्वजनिक बुद्ध जयंती दिल्ली येथे साजरी झाली. या जयंती समारोहास अनेक देशांचे वकील/प्रतिनिधी, भिक्खू समुदाय व सुमारे वीस हजार लोकांचा समुदायही उपस्थित होता. मार्च १९५९ च्या एका अहवालानुसार देशात १.५ ते २ कोटी अस्पृश्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला होता. या घटनेची जागतिक इतिहासात नोंद झाली तर या घटनेने भारतात बौद्ध धर्म पुनर्जीवित झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे धर्मांतर जगात ऐतिहासिक होते. कारण ते जगातील सर्वात मोठे सामूहिक धर्मांतर होते.
महापरिनिर्वाण
नागपूर व चंद्रपूर येथील धर्मांतराचे कार्यक्रम उरकून आणि आता धम्मचक्र पुन्हा एकदा गतिमान झालेले पाहून बाबासाहेब आंबेडकर दिल्लीला परतले. २० नोव्हेंबर १९५६ मध्ये ते नेपाळमधील काठमांडूला 'वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्ट'च्या चौथ्या परिषदेस हजर राहले. आपल्या परतीच्या प्रवासात त्यांनी बनारसमध्ये दोन भाषणे दिली. दिल्लीमध्येही त्यांनी विविध बौद्ध समारंभात भाग घेतला. राज्यसभेच्या अधिवेशनात सहभागी झाले आणि आपल्या 'भगवान बुद्ध आणि कार्ल मार्क्स' या पुस्तकाचे शेवटचे प्रकरण लिहून पूर्ण केले. ६ डिसेंबर १९५६ रोजी दिल्लीला निवासस्थानी त्यांचे महापरिनिर्वाण झाले.
Post a Comment